ग्रामपंचायत लोणी बु.
ग्रामपंचायत लोणी बु., ता. राहाता येथील सन २०११ च्या जनगणनेनुसार १२२९४ इतकी लोकसंख्या आहे. त्यात अनु.
जाती / अनु. जमातीची लोकसंख्या २१५६ इतकी असून इतर १०१३८ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २२३० हेक्टर
इतके आहे. गावामध्ये म्हसोबा मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रुक्माई चे जागृत देवस्थान आहे. गावी दरवर्षी
दत्त जयंतीला ग्रामदैवत म्हसोबा महाराज देवाची यात्रा भरत असून, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये मनोभावे
सहभागी होत असतात.
गावामध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी
सुरू केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांच्या विकासासाठी सहकारी तत्वावर उभ्या केलेल्या
पहिल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळाली. पण गाव, तालुका व परिसरात
विकासाच्या प्रक्रियेला वेगाने सुरुवात झाली ती आजही अविरत सुरू आहे. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राचा
विचार केला तर परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई या मोठ्या
शहरांच्या ठिकाणी जावे लागायचे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी
ग्रामीण भागात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. के.जी. पासून ते पी.जी. पर्यंत असलेल्या
शिक्षणाने भूमीपुत्रांना लोणीतच उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली खरी पण आज दुसऱ्या देशातील व
राज्यातील विद्यार्थीही लोणीत येऊन शिक्षण घेत आहेत त्यामुळे लोणी बुद्रुक शिक्षणाचे केंद्र बनले
आहे.
मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी
अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सर्व
जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व सलोख्याने राहत आहेत. सर्व सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक
कार्यक्रम कोणताही बंदोबस्त न घेता गावात साजरे केले जातात.
लोणी बु. गावामध्ये आरोग्य, कृषी, रोजगारनिर्मिती इतर मूलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत व
विकासाची प्रक्रिया गतिमान पद्धतीने सुरू आहे.



























